01/10/2022
कॉलेजपासून ऑफिसपर्यंत आणि ट्रेनपासून ते अगदी प्रत्येक लहान मोठ्या चाळीत नवरात्रीच्या नऊ रंगाचे राज्यच सर्वत्र पाहायला मिळते. नवरात्र हा स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा सण मानला जातो. या काळात प्रत्येक दिवशी कोणता रंग आहे, त्याचे मेसेजेस अगदी आठवड्याभर आधीपासूनच फिरण्यास सुरुवात होते. अनेक स्त्रिया तर आदल्या दिवशी उद्या कोणता रंग आहे, त्याची साडी कपाटातून बाहेर काढणे, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, ज्वेलरी याची अगदी तयारी करुन ठेवतात. कॉलेजला जाणारी तरुणी असेल तर तीही दुसऱ्या दिवशीच्या रंगांप्रमाणे कपडे परिधान करते.
पण हे रंग नेमके कसे ठरवले जातात? हे कोण ठरवतं? दरवर्षी अमूक दिवशी हाच अमूक रंग असणार हे कसं ठरवलं जातं? हे विशिष्ट रंग परिधान करण्यामागचे वैशिष्ट्य नेमके काय असतं? असे अनेक प्रश्न अनेकदा आपल्याला पडलेले असतात. पण आपण कधीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. नवरात्रोत्सव आला की आपण फक्त ज्या दिवशी जो रंग आहे तो रंग पाहून कपडे खरेदी करुन मोकळे होतो. परंतु आज मात्र आपण यामागे दडलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. आपण त्या दिवशी त्या रंगाची वस्त्रे परिधान केली नाहीत तर पाप लागते किंवा देवीचा कोप होतो, असे काहीही नाही. फक्त त्या दिवसाच्या वारावरुन हे रंग ठरवले जातात. आपल्याकडे ग्रंथामधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरुनच हे ठरवले जातात. यात एकच गोंधळ असतो तो म्हणजे आपल्याकडे सात वार आहेत. मग जे दोन वार परत येतात, त्यादिवशी त्या रंगाचा ‘सिस्टर कलर’ म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो.
यामागचा उद्देश एकच तो म्हणजे सर्वांना आपण एकच आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, यासाठी हे केलं जाते. याचा कुठेही, कोणत्याही ग्रंथात उल्लेख नाही. आपण एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटते. एकीची आणि समानतेची भावना प्रत्येकात निर्माण होते आणि त्यासोबतच आनंद मिळतो. कोणीही न सांगता अनेकजण त्या त्या रंगाचे कपडे परिधान करतात.