Seetai CreationS

Seetai CreationS This is a registered firm which works in all Creative fields, Marketing and Management.

12/07/2025

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय ही बहिणाबाईंची कविता मनाचे विविध रुप उलगडून दाखवते. माणसाचं मन – दिसत नाही, पण सतत बोलत असतं; कधी हळवं, कधी बेचैन, कधी मोहरलेलं, तर कधी खोल खोल उदास. या मनाच्या अस्थिरतेचा, अस्वस्थतेचा शब्दरूप आविष्कार आपल्याला बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" या कवितेत पाहायला मिळतो. आजच्या काळात मानसिक आरोग्य हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच दुर्लक्षितही आहे. आत्महत्या ही त्याची एक गंभीर परिणीती असते. अनेकदा ही गोष्ट क्षणिक अस्वस्थतेतून, मनाच्या अशाच "वढाय वढाय" अवस्थेतून घडते — जी वेळेत ओळखता आली असती, तर थांबवता आली असती. नेमके हेच विचार आपली एखादी जवळची व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा येतात. उमदा कलावंत तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येनंतरही त्याचा मित्रपरिवार याच भावनेने अस्वस्थ झाला. सतत कार्यरत असणार्‍या तुषारने टोकाच्या पाऊल उचलण्यामागे मानसिक ताणतणाव हे मुख्य कारण असल्याचे लक्षात आल्यानंतर याविषयी जनजागृती होणे फार गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली. या जाणिवेतूनच Vibe with the mind या उपक्रमाचे आयोजन मकरंद सावंत यांच्या पुढाकाराने आणि इतर मित्रपरिवाराच्या साहाय्याने करण्यात आले.

या उपक्रमाचे पहिले पुष्प ११ जुलै २०२५ रोजी परळच्या सोशल सर्विस लीगच्या प्रांगणातील दामोदर हाॅल अॅनेक्समध्ये सादर झाले. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते संदेश कुलकर्णी यांच्या 'मानसिक स्वास्थ्य' या संवादात्मक व्याख्यानाने उपस्थितांना शारीरीक स्वास्थाइतकेच मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करुन दिली. संदेश कुलकर्णी हे स्वत: मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांनी वेळीच आपल्यातील अस्वस्थता ओळखून त्यावर उपचार घेतल्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला स्वानुभवावर आधारित उदाहरणांची जोड होती. मानसिक आजाराच्या दिशेने आपली वाटचाल कशी होते हे सांगताना ते म्हणाले की आपल्या भावनांची पातळी इतरांपेक्षा जास्त प्रमाणात वाढते आणि हे लक्षात यायला हवे. आणि ते लक्षात आल्यानंतर आपल्याला मदतीची गरज आहे आणि ती मदत घ्यायला कुठलाही संकोच बाळगू नये असा मोलाचा सल्ला या व्याख्यानादरम्यान त्यांनी दिला.

त्यांनी 'वीस सेकंदाची मिठी' या संकल्पनेची ओळख करुन दिली. "वीस सेकंदांची मिठी" ही फक्त शारीरिक जवळीक नसून एक भावनिक संवाद आहे. अशा मिठीतून शरीरात 'ऑक्सिटॉसिन' हा प्रेम व विश्वास निर्माण करणारा संप्रेरक निर्माण होतो, ज्यामुळे तणाव कमी होतो, मन हलकं वाटतं आणि आत्मीयता वाढते. मनोविकारतज्ज्ञ सांगतात की अशा मिठ्या मानसिक आरोग्यासाठी औषधासारख्या असतात. कोणताही शब्द न उच्चारता माणसाला आधार देण्याचा हा एक अतिशय प्रभावी आणि आपुलकीचा मार्ग आहे. यावरुन आठवले की मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात वापरलेली 'जादू की झप्पी' हा देखील याच संकल्पनेचा भाग असावा. मुन्नाभाई (संजय दत्त) जादूकी झप्पी देऊन लोकांना आपलेसे करतो.

व्याख्यानामुळे मानसिक स्वास्थ्याविषयी उपस्थितांना बरीचशी माहिती मिळाली आणि प्रश्नोत्तरामुळे बर्‍याचशा समज गैरसमजांचीही उकल झाली. असे कार्यक्रम यानंतर सातत्याने आयोजित करुन मानसिक स्वास्थ्य या विषयावर जनजागृतीची चळवळच उभारण्याचा संकल्पही यादरम्यान सोडण्यात आला. Vibe with the mind या उपक्रमाची चळवळ यशस्वी होऊन आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होण्याची दिशा मानसिक पातळीवर अस्वस्थता जाणवणार्‍यांना सापडावी हीच सदिच्छा.

- दीपक गुंडये.

27/03/2025
23/11/2024

संगीत बिबट आख्यान - एक सुंदर नाट्याविष्कार !

मनुष्याने प्राण्याच्या अधिवासावर अतिक्रमण केल्यानंतर प्राण्यांचे जीवनमान धोक्यात आले. त्यामुळे त्यांची संख्याही कमी होऊ लागली. तशी ती होऊ नये म्हणून अभयारण्ये, संरक्षित क्षेत्रे राखीव ठेवण्याची गरज निर्माण झाली आणि प्राणी संवर्धन प्रकल्पांची संकल्पना राबवावी लागत आहे. वनविभाग यात महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावत आहे. मनुष्यामुळे संकटात आलेल्या वाघ, सिंह इत्यादी प्राण्यांप्रमाणेच बिबळ्या किंवा बिबट्या हाही मानवी वस्तीतील वावरामुळे मानवाच्या हिटलिस्टवर आहे. पण बिबट्या खरंच मानवासाठी धोकादायक आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर 'संगीत बिबटआख्यान' हा लोककलेच्या अंगाने जाणारा नाट्यप्रयोग अवश्य पहायला, अनुभवयाला हवा.

नेहरु सेंटरने बालदिनानिमित्त २२ नोव्हेंबर २०२४ रोजी या नाटकाचा खास प्रयोग बच्चेकंपनीसाठी ठेवला होता. नाटकाचा केंद्रबिॅंदू असलेल्या दोन बिबट्यांचा रंगमंचावर अधूनमधून होत असलेला वावर, तर कधी प्रेक्षागृहातूनच दबक्या पावलाने घेतलेला प्रवेश बच्चेकंपनीच्या चेहर्‍यावर एकाचवेळी कुतुहलमिश्रीत भीतीची भावना निर्माण करत होती. कदाचित प्रेक्षकांमधूनच बिबट्यांचा प्रवेशातून हेच सूचित करायचे असावे की तुम्ही बिबट्याचे आसपास असणे मान्य केले तर त्याच्यापासून तुम्हाला काही धोका नाही.

लेखक, दिग्दर्शक आणि नाटकातील एक प्रमुख व्यक्तिरेखा अशी तिहेरी भूमिका मकरंद सावंत यांनी समर्थपणे लीलया पार पाडली आहे. पारंपरिक नांदीने सुरुवात झालेला हा नाट्यप्रयोग लोककलेचे सर्व प्रकार हाताळत भैरवीकडे पोहोचतो तेव्हा बिबट्यासंबंधीचे समज गैरसमज प्रेक्षकांच्या लक्षात आणून देण्यात यशस्वी ठरतो. नाट्यप्रयोगात बालप्रेक्षकांनीही सामावून घेतल्यामुळे तेही समरस होतात. संगीत नाटक असल्यामुळे रंगमंचावरील गायकवृंद आणि वाद्यवृंद यांची साथही तितकीच तोलामोलाची आहे. सर्वच कलावंतांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. लोकसंगीताचा वापर केल्यामुळे संगीत दिग्दर्शनही मस्त झाले आहे. एकूणच हा नाट्यप्रयोग अवश्य पहायला हवा.

दीपक गुंडये.

Address

Mumbai
400031

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seetai CreationS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Seetai CreationS:

Share